लोबोंना  शिवोलीत भंडारी समाजाच्या एखाद्या नेत्याला का उभे केले नाही; कवळेकरांचा घणाघात  

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच मायकल लोबो यांच्यावरमाजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते  रोहन कवळेकर यांनी तोफ डागली आहे. माजी मंत्री मायकल लोबो यांनी पक्षापेक्षा पत्नीप्रेमा महत्त्वाचे वाटले म्हणून ते भाजपसोडून काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते इतरांना निष्ठेचे धडे  देत असल्याची घणाघाती टीका कवळेकर यांनी केली आहे.

लोबो कचरा व्यवस्थापन मंत्री असताना त्यांनी म्हापशासाठी कोणती मदत केली, ते सांगावे. कळंगुटमधील घरे नियमित करून देण्यासोबतच, तेथील राणकार, मच्छीमार बांधवांची त्यांनी नेहमीच फसवणूक केल्याचा आरोप  रोहन कवळेकर यांनी केले. मंगळवारी उत्तर गोवा भाजप कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बार्देश भंडारी समाजाचे अध्यक्ष नारायण मांद्रेकर, माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके उपस्थित होते.

कवळेकर म्हणाले, मायकल लोबोंनी कळंगुट मध्ये शांतादुर्गा मंदिराच्या जागेत सिव्हेज पंपिंग स्टेशन यावे, यासाठी प्रयत्न केले. तसेच, बाबरेश्वर मंदिराकडे स्मशानभूमीस विरोध केलेला. मुळात म्हापशाचा विकास व्हावा, अशी मायकल यांची इच्छा नसून, केवळ सुधीर कांदोळकर यांच्या प्रेमापोटी ते म्हापशात घुसखोरी करताहेत, असा आरोप रोहन कवेळकरांनी केला. मायकल लोबो हे भंडारी समाजावर आपले प्रेम असल्याचे सांगतात. इतकाच लोबोंना भंडारी समाजाचा पुळका असता, तर शिवोलीत लोबोंनी एखाद्या भंडारी नेत्याला का उभे केले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.