शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचे १०५ आमदार निवडून येणं शक्य नव्हतं – राऊत

पुणे  – पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख आणि अन्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काल मार्गदर्शन केलं. राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा आलेख यावेळी मांडला. पुणे महापालिका निवडणुकीतील विजयानं आपण महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला सुरुवात करू; असं आवाहन शहा यांनी केलं.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने विश्वासघात केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं खुलं आव्हानही अमित शहा यांनी दिलं. आता या आव्हानाला शिवसेनेने प्रतिआव्हान दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. राऊत यांनी आधी भाजपाच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शाह यांच्या आव्हानाला प्रति आव्हान दिलंय.

“आपण सुद्धा हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे १०५ आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. तुमच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत १०५ निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणारा शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे.