भाजपसोबत 50-50 टक्के सत्ता वाटप करण्याचं ठरलं होतं; संजय राऊत यांचा दावा 

पुणे – पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख आणि अन्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काल मार्गदर्शन केलं. राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा आलेख यावेळी मांडला. पुणे महापालिका निवडणुकीतील विजयानं आपण महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला सुरुवात करू; असं आवाहन शहा यांनी केलं.

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले. मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले. ज्यांच्याबरोबर दोन पिढ्या वाद घातला त्यांच्या मांडीवर जाऊन शिवसेना बसली, अशा शब्दांत शहा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.विधानसभेच्या गेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने विश्वासघात केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं खुलं आव्हानही अमित शहा यांनी दिलं.

आता या आव्हानाला शिवसेनेने प्रतिआव्हान दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. राऊत यांनी आधी भाजपाच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शाह यांच्या आव्हानाला प्रति आव्हान दिलंय. “आपण सुद्धा हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे १०५ आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. तुमच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत १०५ निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.  भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह याच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये असे राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणारा शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे.