विधानसभेच्या गेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेनेचं विश्वासघात केला – अमित शाह 

 पुणे – पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख आणि अन्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काल मार्गदर्शन केलं. राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा आलेख यावेळी मांडला. पुणे महापालिका निवडणुकीतील विजयानं आपण महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला सुरुवात करू; असं आवाहन शाह यांनी केलं.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने विश्वासघात केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं खुलं आव्हानही अमित शहा यांनी दिलं. कोरोना काळात देशाने आरोग्य व्यवस्थेत जी झेप घेतली आणि लसीकरणातही जे उद्दिष्ट गाठलं त्याच कौतुक साऱ्या जगाने केल्याचं शहा म्हणाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांचीही या मेळाव्यात भाषण झाली.

तत्पूर्वी आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात काल सकाळी अमित शहा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं केली. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचं आपलं ध्येय लवकर पूर्ण होवो असं मागण अमित शाह यांनी गणपतीसमोर मागितलं.