मुस्लिमांचा द्वेष करण्यात ज्यांचे आयुष्य गेले आहे त्यांना जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही – Sunil Tatkare

विकासावर आधारीत आणि सर्व धर्मांना एकत्र घेऊन रायगड जिल्ह्यात काम, त्यामुळेच लोकांचे प्रेम मिळत आहे - सुनिल तटकरे

 Sunil Tatkare – विकासावर आधारीत आणि सर्व धर्मांना एकत्र घेऊन रायगड जिल्ह्यात आम्ही काम करत आलो आहोत त्यामुळेच आज मला लोकांचे प्रेम मिळत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.आम्ही राजकीय भूमिका घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच माझ्या अल्पसंख्याक बांधवांशी माणगाव येथे संवाद साधत असल्याचे सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.

लोकांच्या मनात स्थान मिळतेय, त्यांचे काम करण्याचा भाग्य मला मिळत आहे असे सांगतानाच अल्पसंख्याक समाजापेक्षा कमी मते माझ्या समाजाची आहेत त्यामुळे मीही अल्पसंख्याक समाजाचा साथीदार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.पक्षाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचे आम्ही काम करत आलो आहोत. त्यामुळे मी पहिल्यांदा भारतीय नागरिक आहे या भावनेतून आमची वाटचाल सुरू आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हयात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम कधी झाले नाही असे काम रायगड जिल्ह्यात केले असल्याचे स्पष्ट करतानाच ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन रायगड येथे केली. त्या जिल्ह्यात तुम्ही – आम्ही एकत्र राहण्याची काळाची गरज आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

आम्ही सर्वधर्मसमभावाचे विचार सोडणार नाही. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचारधारा सोबत घेऊन आम्ही एनडीएमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालो असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आज समाजा – समाजात दरी निर्माण केली जाते आहे. आज राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी द्वेष पसरवण्याचे काम आम्ही एनडीएमध्ये सहभागी झाल्यावर काही लोकं करत आहेत त्यांचा सुनिल तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.महायुतीच्या सभेत राजकीय भूमिका घेताना आमच्या भूमिकेपासून तसूभरही बाजूला जाणार नाही असा शब्द दिल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मुस्लिमांचा द्वेष करण्यात ज्यांचे आयुष्य गेले आहे. त्यांना जागा दाखवल्याशिवाय आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन सर्वांना विकासाकडे घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा जो मेळावा घेतला ती माझी ताकद नाही तर तुमची ताकद आहे अशा शब्दात कार्यकर्त्यांचे कौतुक सुनिल तटकरे यांनी केले.

जालना येथील घटना ही दुर्दैवी आहेच शिवाय आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी सुनिल तटकरे यांनी केली.यावेळी सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात होत असलेल्या अनेक विकासकामांचा उल्लेख केला.माणगाव तालुका अल्पसंख्याक सेलचा भव्य मेळावा आज माणगाव मधील गांधी मेमोरियल सभागृहात पार पडला.यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालकल्याण विकासमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश चिटणीस मुखत्यार वेळासकर, प्रदेश सरचिटणीस अतिक खतीब, दापोली विधानसभा अध्यक्ष मुजीब रुमाणे, दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगी, श्रीवर्धनचे अध्यक्ष महम्मद मेमन, गोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जुबैर अब्बासी, अल्पसंख्याक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष नाझीम हसवारे, जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफशेठ धनसे, उपाध्यक्ष हिदायत कुदरते, माणगाव अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बाळाभाई सनगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.