Jalna Lathicharge Case : मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही; आदित्य ठाकरेंचा दावा

या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे.

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधकांनी राजकारण करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसत आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही’, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की,  जो लाठीचार्ज झाला आहे तो अत्यंत भयानक आहे. असं कोणी शत्रूसोबत देखील वागत नाही. तर यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला आहे. आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे की,  मी दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यलय जवळून पाहिलं आहे. इतकी संवदेनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही असं होऊ शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाही. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर सरकार राजीनामा देईल. असं ठाकरे यांनी म्हटले आहे.

येथे वाचा आणखी बातम्या