तुम्ही मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा, जनता तुमच्या छाताडावर बसेल – बावनकुळे 

Chandrashekhar Bawankule :  तुमची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी असल्याचे म्हणत  सामना अग्रलेखावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मोदीजींच्या (Narendra Modi) ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा, जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुमचा कुटुंब वाचवण्यासाठी अजेंडा तर मोदीजींचा देश वाचविण्यासाठीचा अजेंडा असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले,  मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मा. मोदीजी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, करोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.

तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल.महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे.

मोदीजींचा तुमच्या(I.N.D.I.A.)विरोधातील संघर्ष हा स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव ‘ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदीजींच देशसेवेचं कार्य अखंड सुरू राहणार आहे.आस देखील त्यांनी म्हटले आहे.