ऋतुराजच्या ९२ धावांच्या खेळीवर पाणी, गुजरातने शेवटच्या षटतात सामना जिंकत फोडला विजयाचा नारळ

अहमदाबाद- शुक्रवारी (३१ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल २०२३चा पहिला सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने निर्धारित २० षटकात १७८ धावा केल्या. यादरम्यान चेन्नईने ७ विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने ४ चेंडू शिल्लक असताना ५ विकेट्स राखून चेन्नईने आव्हान पूर्ण केले आणि विजयासह हंगामाचा श्रीगणेशा केला.

चेन्नईच्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल याने चिवट खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ६३ धावा फटकावल्या, यात त्याच्या ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. तसेच सलामीला वृद्धिमान साहानेही २५ धावांच्या झटपट खेळीचे योगदान दिले. याशिवाय राहुल तेवतिया (१५ धावा) आणि विजय शंकर (२७ धावा) यांनीही विजयात बरोबरीचे योगदान दिले.

या डावात चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वात महागडी गोलंदाजी केली. ३.२ षटके फेकताना त्याने सर्वाधिक ५१ धावा दिल्या आणि केवळ १ विकेट घेतली. मात्र पदार्पणवीर राजवर्धन हंगारगेकरने केवळ ३६ धावांवर ३ विकेट्स घेत आपली प्रतिभा दाखवली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने धडाकेबाज खेळी केली. ५० चेंडूत ९ षटकार आणि ४ खणखणीत चौकार ठोकत त्याने ९२ धावा फटकावल्या. अठराव्या षटकात अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर शुबमन गिलच्या हाती झेल देत ऋतुराज बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. ऋतुराजव्यतिरिक्त मोईन अलीने २३ धावांची झटपट खेळी केली. तर शेवटच्या षटकांत कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) षटकार-चौकारांची बरसात करत धावफलक हालते ठेवले. ६ चेंडूत १ षटकार आणि चौकार मारत धोनीने नाबाद १३ धावांचे योगदान दिले. या डावात गुजरातकडून मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.