देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनेल,सोशल मिडिया अकाउंटस आणि वेबसाईटला केंद्र सरकारचा दणका 

नवी दिल्ली-  महागाई, जीएसटी दरवाढ आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात काल वारंवार व्यत्यय आला. त्यामुळे सुरुवातीला काही काळ आणि त्यानंतर अखेर दिवसभरासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

सरकार या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करायला तयार असल्याचं संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं. कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. देशविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारनं काय कारवाई केली असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला. त्यावर काही युट्युब चॅनेल, ट्विटर आणि फेसबुक खात्यांवर निर्बंध आणल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

आतापर्यंत 94 युट्युब चॅनल, 19 सोशल मीडिया खाती आणि 747 लिंक बंद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.  ठाकूर म्हणाले की, भारताची एकता आणि अखंडता आणि सुरक्षा लक्षात घेऊन अशा प्रकरणांमध्ये वेळोवेळी कारवाई केली जाईल.