आरोग्य विभाग पदभरती परिक्षेबाबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत खुलासा करण्याची युवासेनेची मागणी

पुणे – आरोग्य विभागाच्या गट ड साठी पद भरती परीक्षा उद्या दि. ३१ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा सुव्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. आज सकाळ पासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओ मधील मेसेजनुसार पेपर फुटीचा प्रकार असल्याचा आरोप केला जातो आहे.

याबाबत तातडीने खुलासा करून उचित कारवाई करण्याची मागणी युवसेनेच्या कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे. यादव म्हणाले, आरोग्य विभागाच्या प्रत्येक पद भरती परीक्षेत काही संघटनेकडून आरोग्य विभाग व यंत्रणेस बदनाम करण्याचे कारस्थान रचले जाते सदर व्हिडिओ आणि मेसेज राज्यभरात व्हायरल होतो आहे.

याचा थेट परिणाम परीक्षार्थी तरुणांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे या व्हिडीओ बाबत तातडीने चौकशी करून व्हिडिओ फेक असल्यास संबंधित संघटनेवर तातडीने कारवाई करावी अथवा व्हडिओ सोब जोडलेल्या संदेशात तथ्य असल्यास व्हिडीओ मधील संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी पाटील यांच्या कडे यादव यांनी केली असल्याचे यादव म्हणाले. याबाबत त्यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे.