धर्माच्या नावावर अभिनय सोडणारी झायरा वसीम हिजाबच्या समर्थनार्थ उतरली 

नवी दिल्ली-  कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातून सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशाच्या विविध भागांत दिसून येत आहे. त्याचबरोबर राजकीय वक्तव्यांमुळे देखील या वादाला अधिक हवा मिळाली आहे. यातच आता अभिनेत्री झायरा वसीमने याबाबत भाष्य केले आहे.   ‘दंगल’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायराने धर्माच्या नावावर अभिनय सोडला आहे. आता तिने हिजाबच्या वादावर आपले मत मांडले आहे, त्यामुळे ती चर्चेत आहे.

झायरा वसीमने हिजाबच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. झायरा वसीमने लिहिले की, इस्लाममध्ये हिजाब हा केवळ पर्याय नसून ती जबाबदारी आहे. जेव्हा एखादी महिला हिजाब वापरते तेव्हा ती देवाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडत असते.

झायरा वसीमने लिहिले आहे की, महिला केवळ हिजाब घालून आपली जबाबदारी पूर्ण करत नाहीत तर यातून त्यांचे देवावरील प्रेम दिसून येते. त्याच वेळी, हे स्पष्ट होते की त्याने स्वतःला त्याच्या देवासाठी समर्पित केले आहे.

जायरा वसीमने तिच्या सोशल मीडिया नोटमध्ये पुढे लिहिले की, मी देखील एक महिला आहे. मी पण हिजाब घालते. आणि मी या व्यवस्थेचा तीव्र विरोध करते ज्यामध्ये महिलांना त्यांच्या धार्मिक परंपरांचे पालन करण्यापासून रोखले जाते आणि त्यांचा छळ केला जातो. शिक्षण आणि हिजाब यापैकी कोणाला निवड करावी लागेल ही व्यवस्था पूर्ण अन्याय आहे.