शिवसेनेच्या कांदेंनी भुजबळांची झोप उडवली, राष्ट्रवादीला पाडले मोठे भगदाड !

नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील वाद काही नवा नाही. या दोन्ही नेत्यांतील कलगीतुरा संपूर्ण महाराष्ट्राने याआधी देखील पाहिला आहे. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांच्या वादाचा नवा अंक समोर आला आहे. आता सुहास कांदे यांनी नांदगावमध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पाडले आहे.

भुजबळांचे पक्के समर्थक आणि समता परिषदेच्या माजी शहराध्यक्षांना थेट शिवसेनेत घेत कांदेंनी भुजबळांना जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नांदगावमधील राजकीय गणितामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होऊ शकतात, अशी चर्चा आहे. यावर आता भुजबळांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, कांदे यांच्यामुळे माजी आमदार पंकज भुजबळ यांचे समर्थक व समता परिषदेचे माजी शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. साकोरा येथे जिल्हा परिषद गटातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी माजी सभापती राजेंद्र चंवर, वेहेळगावचे भावडू गिते, वाल्मिक अहिरे, सुरेश बोरसे, अण्णा सुरसे, निलेश सुरसे, एकनाथ मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरलीय. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत स्थानिक गणिते अतिशय महत्त्वाची असतात. त्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचे कांदे यांनी दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.