वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मिती ; ३६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट -पाटील

मुंबई : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रुप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरीय, एसआरटीईपीसीचे चेअरमन धीरज शहा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करुन खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. जागतिक पातळीचे वस्त्रोद्योग महाराष्ट्रात प्रदर्शन भरविण्यासाठी सेंटर उभारण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत, असे सांगून केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (NTTM) अंतर्गत मुंबईत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाने तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-2023 या परिषदेला राज्यशासन सहकार्य करेल, असेही पाटील यांनी सांगितले.