हळदीच्या कार्यक्रमात विहिरीत पडून १३ महिलांचा मृत्यू ! नरेंद्र मोदींनी देखील केला शोक व्यक्त

कुशीनगर : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बुधवारी रात्री एका लग्न समारंभात विहिरीत पडून महिला आणि मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नातील महिला आणि मुले जुन्या विहिरीवर बसले होते. ते स्लॅबने झाकलेले होते. वजनामुळे स्लॅब खाली पडला आणि त्यावर बसलेले लोकही विहिरीत पडले. घटनेनंतर लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी 13 जणांना मृत घोषित केले. या घटनेत अजूनही 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये एका नववधूच्या हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परीसरातील नातेवाईक, महिला जमल्या होत्या. घरासमोर एक मोठी विहीर बांधलेली होती. त्या विहिरीला लोखंडी जाळी बसवली होती. हळदीच्या कार्यक्रमाला आलेल्या महिला त्या विहिरीच्या जाळीवर बसल्या. परंतु त्या महिलांचा वजन जास्त झाल्याने ती जाळी तुटली आणि जाळीवर बसलेल्या सगळ्या महिला विहिरीत पडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी विहिरीत पडलेल्या महिलांना बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पूजा (19), शशी कला (15), शकुंतला (35), ममता देवी (35), मीरा (25), पूजा (20), परी (एक), ज्योती (15), राधिका (16), सुंदरी (१५) यांचा आरती (१०), पप्पी (२०) आणि मनू (१८) या महिलांचा समावेश आहे. या अपघातात आणखी १० जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो. यासोबतच जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना करतो. माझी इच्छा आहे की, स्थानिक प्रशासनाने शक्य ती सर्व मदत करावी.