‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – छगन भुजबळ

गणेशोत्सवानिमित्त राज्यात १ कोटी ५७ लाख 'आनंदाचा शिधा' संच वाटणार

Chhagan Bhujbal – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील १ कोटी ५७ लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला ‘आनंदाचा शिधा’ मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले.

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार निरांजना पराते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नाशिक विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मकरंद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १ कोटी ५७ लाख लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वाटप होणार असून त्याचा राज्यातील साधारण ७ कोटी जनतेला लाभ होणार आहे. जिल्ह्यातील साधारण ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. या ‘आनंदाचा शिधा’ संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार वस्तूंचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत वितरित केला जाणार आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या आनंदाचा शिधाच्या माध्यमातून गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.

येवला तालुक्यात १४० रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्रयरेषेखालील, पिवळ्या, केसरी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ संचांचे वाटप करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४ अशा साधारण ३८ हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींसाठी राज्यात १२ लाख घरे बांधण्यात येणार असून त्‍यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने १२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी ५०० नवीन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-
तुम्ही PIN शिवाय 500 रुपये पाठवू शकता, Paytm वर UPI Lite सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस