2 नंबरी सरकारची 2 वर्ष; चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारवर काव्यात्मक टीका…

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान,  भाजपनेत्या चित्रा वाघ (Chitra Waagh) यांनी महाविकास आघाडीवर एक छोटी कविता करत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट त्यांच्या कवितेला ‘2 नंबरी सरकारची 2 वर्ष’ असं शीर्षक दिलं आणि लिहीलं की, “देशमुखांना वसूलीची घाई, परबांची मुजोरशाही. मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’. निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही. संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई. मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, 2 नंबरी मविआ सरकारची ही काळी कमाई!” अशा काही काव्यात्मक अंदाजात त्यांनी अगदी कमी शब्दांत सरकारवर मोठी टीका केली आहे.