Chinmay Mandlekar | भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही! चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली; नेमकं प्रकरण काय?

Chinmay Mandlekar | चाहत्यांना सेलिब्रिटींच्या अभिनय, चित्रपटाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रचंड रस असतो. फिल्मी दुनियेबाहेर अभिनेते वा अभिनेत्री कसे कपडे घालतात, काय खातात, त्यांचे कुटुंबीय अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बऱ्याचदा सेलिब्रिटींबद्दल चाहते आपली मतेही मांडताना दिसतात. मात्र काहीवेळा त्यांच्याकडून मर्यादा ओलांडल्या जातात. मराठी व हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. यावरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

जहांगीर हे मुस्लिम नाव आहे. त्यामुळे तुम्ही ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज केले जात आहेत. हे पाहून चिन्मयची पत्नी नेहा मांडलेकर भडकली. नेहा मांडलेकरने एक व्हिडिओ पोस्ट करत चागत्यांवर त्रागा व्यक्त केला आहे.

व्हिडीओत नेहा मांडलेकर म्हणाली, “नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माझी जात आधी सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी कासार आहे. मी हिंदू आहे. हा व्हिडीओ करण्यामागचं एकच कारण आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. माझे पती, त्यांचं नाव चिन्मय दिपक मांडलेकर त्यांची जात कासार आणि तेही हिंदूच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर खूप सारं ट्रोलिंगला आम्ही सामोर जातोय. माझे पती हे पब्लिक फिगर आहेत. त्यांचं काम हे रसिक मायबाप पाहतात, ते काम आवडलं तर त्यांना रसिक मायबाप डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की, त्यांनी त्यांची कानउघडणी करावी. कारण कलाकार हा सतत पब्लिक आयमध्ये असतो; जे मान्य आहे. पण सध्या ट्रोलिंग माझ्या पतीच्या कामाबद्दल होतं नाहीये. तर ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरून होतंय.”

“माझा पती पब्लिक फिगर आहे म्हणून त्याच्या मुलाच्या नावाचा रस घेऊन चर्वण करायचा हक्क नाहीये. पण लोकांनी तोही ओरबडून घेतला असेल. तरीही हा व्हिडीओ मुद्दाम मी एवढ्यासाठी करतेय लोकांना हे आठवण करून द्यायला की, त्या मुलाला एक आईसुद्धा आहे. जी कलाकार नाहीये. जी पब्लिक आयमध्ये नसते. जी पब्लिक फिगर नाहीये. तिला आणि तिच्या मुलांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे. अनेकदा काय होतं, मोबाइलमध्ये टाइप करताना विसरतो की, पलीकडे एक माणूस ही गोष्ट वाचणार आहे. हे फक्त सगळं एखाद्या रोबॉटिक पॉटला फक्त वाचावं लागणार नाहीये. एक माणूस ते वाचतो. ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जातंय, तो एक दहा-अकरा वर्षांचा मुलगा आहे. बरं का ट्रोल होतंय? तर त्याचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ नाव कधी ठेवलं आता सगळंच सांगते. कारण की मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खरंतर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधिल नाहीये. पण मलाच असं वाटलं की, अज्ञानातून हे ट्रोलिंग होतं असेल. तर माझी ही जबाबदारी आहे अज्ञान दूर करावं. म्हणून हा व्हिडीओ आणि खटाटोप करतेय.”

“तर माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ला झाला. २१ मार्चला २१ मार्च जमशेदी नवरोज असतो. तुम्ही कॅलेंडर उघडून बघू शकता. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणदायी कुटुंब संस्था आहे. ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला. अनेक पालक आपल्या मुलाचं नाव अर्थ आवडला आणि अर्थपूर्ण ठेवतात. आता या भारतात असलेले प्रत्येक अक्षय याचं नाव काय त्यांच्या पालकांनी अक्षय कुमारवरून ठेवलं नसेल ना. अक्षय या शब्दाचा अर्थ आवडला असेल. आता सुचवणारे असे ही सुचवतात की, जगज्जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं? किंवा तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं? त्याचेही अर्थ असे होतात. तर तो हक्क आम्हाला पालक म्हणून असावा.”

“बरं दुःख काय आहे; हे मुस्लिम नाव आहे. आपण तो देश आहोत की, आपण शतकानु शतके मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र राहतो. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात बघाल तरी आपले सुपरस्टार्स देखील मुसलमान आहेत. क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचा हजार, करोडमध्ये आपण त्यांना व्यवसाय करून देतो. ते चालतं? माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे आणि ते किती वर्ष चालणार आहे. माझ्या नवऱ्याने बिट्टा कराटे पात्र साकारलं. तर म्हणतात, रोल फारच सिरियसली घेतला. नाव लगेच मुस्लिम ठेवलं. बिट्टा कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्ष आधी नाव ठेवलं होतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तर म्हणतात हा काय स्क्रीनवर जिरेटोप घातलो. पण मुलाचं नाव ‘जहांगीर’चं ठेवलं. तर स्क्रीनवर जिरेटोप घालण्याआधी माझ्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा त्याचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं होतं. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवून आम्ही चूक नाही केली. तो हक्क आम्हाला आहे.”

“पण आम्हाला हे एक कळलं, महाराजांवर किंवा महाराजांच्या शिकवणीवर कितीही श्रद्धा असली, कितीही प्रेम असलं, आमच्या घरात महाराजांच्या किती प्रतिमा असल्या, बोलताना महाराजांच्या धाडसाचे दाखले आमच्या मुलांना देत असलो तरी या देशात अपुऱ्या आहेत. कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचा अधिकार सगळ्यांकडे नाहीत. ते आमच्याकडे नाही. शिवाय पात्र स्क्रीनवर करण्याचा हक्क नाही. तर यासाठी मी उभा महाराष्ट्राची माफी मागते की, आम्ही आमच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असून सुद्धा स्क्रीन महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं. आम्हाला क्षमा करा. आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की, महाराज हे एका नटाच्या नावाच्या पलीकडे आहेत. त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो, आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं.”

“आज सकाळीच एक सद्गृहस्थांचा मेसेज आला की, ‘हा देश सोडून जा. तुम्ही अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ राहा.’ ते वाचलं आणि वाईट वाटलं. अनेक लोक सल्ले देतात, ट्रोलर्स काय मनावर घ्यायचं. पण जसं मी मगाशी बोलले मोबाइलच्या पलीकडे एक माणूस वाचत असतो. तसं हे मी नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे एक माणूसच टाईप करतोय. या देशातल्या एका व्यक्तीला, मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा, असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला. याचं मला वाईट वाटलं, याची मला खंत आहे आणि म्हणून हा व्हिडीओ आहे. परत कोणी मला असला सल्ला देऊन नये. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत. जेआरडी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतला आहे. तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. या व्हिडीओनंतर ट्रोलिंग थांबणार आहे का? तर अजिबात नाही. वाढणार? तर हो, निश्चित दुप्पटीने वाढणार आहे. खूप मेसेज येणार आहेत. पण आता माझ्याकडून मी माझं काम केलंय, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. धन्यवाद,” असं नेहा मांडलेकर (Chinmay Mandlekar) म्हणाली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा