परळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आता २८६ कोटी रुपये मिळणार!

धनंजय मुंडेंच्या अथक प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली सुधारित आराखड्यास मान्यता;शिखर समितीच्या बैठकीत झाला निर्णय

Parali Vaidyanath- परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaijnath) विकासासाठी आता २८६.६८ कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास आज मान्यता देण्यात आली आहे.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तसेच परळीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ आराखडा हा १३३ कोटींचा होता. मात्र मंदिरात दगडी भिंती बांधून जीर्णोद्धार करणे, यात्री प्रतिक्षालय अशी एकूण ९२ कामे करावयाची असून, या कामांची किंमत अनेक पटींनी आता वाढली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी बीड यांनी या कामाचा सुधारित आराखडा मान्यतेस्तव सादर केला होता. धनंजय मुंडे यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे.

अनेक शतकापूर्वी वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्याच धर्तीवर आता नव्याने जीर्णोद्धार व विकास व्हावा, मेरू पर्वत, प्रदक्षिणा मार्ग विकसित व्हावा, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ मंदिरांसह परिसरातील अन्य सर्व मंदिरांचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने हा विकास आराखडा मंजूर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

जुन्या मंदिरांना रंग न देता त्यांना दगडासारखा रंग द्यावा, मंदिराची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मंदिर समितीसह परळी नगर परिषदेने घ्यावी, तसेच ठिकठिकाणी दाट सावली देणारी झाडे लावावीत शिवाय पाय घसरणार नाहीत अशा फरश्यांचा वापर पायऱ्यांमध्ये करावा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्या.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव मनोज शौनिक, नगर विकास तसेच वित्त व नियोजन विभागाचे सचिव, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे सचिव त्याचबरोबर विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड (ऑनलाइन), बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते वाल्मिक अण्णा कराड, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, नगर अभियंता बेंडले, आर्किटेक्ट कृष्णकुमार बांगर आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे हे निस्सीम शिवभक्त म्हणून सर्वपरिचित आहेत. परळीत असल्यानंतर प्रत्येक दिवशी न चुकता वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे पूजन, दर्शन केल्यानंतरच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्रसरकारच्या यादीत दर्जा कायम रहावा यासाठीच्या संघर्षाचे नेतृत्व धनंजय मुंडे यांनी केले. प्रत्येक श्रावण महिन्यात तसेच शिवरात्रीला मंदिराची सजावट, भाविकांना मोफत प्रसाद अशा अनेक व्यवस्था धनंजय मुंडे करत असतात. श्रावण महिन्यात त्यांच्या घरी कावड पूजन देखील असते. त्याचबरोबर वैद्यनाथ मंदिराच्या जमिनी नाथरा या धनंजय मुंडे यांच्या जन्मगावी असल्याने त्यांना सेवेचाही वारसा लाभलेला आहे.

महत्वाच्या बातम्या-

IND Vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण

सिक्कीमच्या ढगफुटीत बीडचा जवान शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार