मुंबई आणि पुण्यातील घरांच्या किंमतीत ३ टक्क्यांची वाढ

घरांच्या मोठ्या मागणीमुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये ६ टक्क्यांची वाढ

मुंबई : या वर्षातील एप्रिल ते जून कालावधीदरम्यान भारतातील (India) निवासी मालमत्ता बाजारपेठेत घरांच्या किमतीमध्ये सरासरी वार्षिक ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्‍ट्रातील (Maharashtra) दोन प्रमुख मालमत्ता बाजारपेठा मुंबई व पुणे येथील घरांच्या किंमतीत प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढ झाली (3 Percent Increase), जेथे मुंबईमध्ये (Mumbai) सरासरी किंमत प्रतिचौरस फूट १०,१०० ते १०,३०० रूपये राहिली, तर पुण्यामध्ये (Pune) किमती प्रतिचौरस फूट ५,६०० ते ५,८०० रूपये होत्या. देशातील आघाडीची ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगरने (PropTiger) जारी केलेल्या डेटामधून ही माहिती मिळाली आहे. अहवालात समाविष्ट बाजारपेठांमध्ये मुंबई, पुण्यासहित अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, आणि दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा समावेश आहे.

आघाडीची डिजिटल रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी आणि हाऊसिंगडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे मालकीहक्क असलेल्या आरईए इंडियाचा भाग असलेली कंपनी प्रॉपटायगरने नुकतेच जारी केलेला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२३’ मधून निदर्शनास आले की, भारतातील आठ प्रमुख शहरांमधील निवासी मालमत्तांची भारित सरासरी किंमत एप्रिल ते जून कालावधीदरम्यान प्रतिचौरस फूट ७,००० ते ७,२०० रूपयांपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत किमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा अहवाल भारतातील प्रमुख शहरांमधील रिअल इस्टेट बाजारपेठेच्या विद्यमान स्थितीबाबत बहुमूल्य माहिती देतो.

आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ आणि प्रॉपटायगरडॉटकॉम येथील व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले, कोविडनंतरच्या काळात भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ होत आहे. भांडवल मूल्यांमधील ही वाढ गुंतवणूकदारांचे भारतातील प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठांकडे लक्ष वेधून घेत असताना नवीन पुरवठ्यामधील वाढीमुळे किमतीत काहीशी वाढ होत आहे.

आरईए इंडियाच्या संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्हणाल्या, गुरूग्राममध्ये व्यवसाय व मोठ्या कंपन्यांकडून मागणीमध्ये वाढ होताना दिसण्यात येत आहे. शहर ग्रेड ए व्यावसायिक विकासासंदर्भात प्रभुत्व राखत आहे, तसेच व्यवसायासाठी अव्वल निवड म्हणून आपले स्थान प्रबळ करत आहे. ही गती कायम राखत गुरूग्राम मालमत्ता बाजारपेठेत लक्झरी व मध्यम विभागाच्या गृहनिर्माणासाठी उत्तम मागणी दिसण्यात आली आहे. २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत गुरूग्रामच्या वार्षिक भारित सरासरी मालमत्ता किमतीत १२ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, जेथे शहराने बेंगळुरू (९ टक्के) व नोएडा (८ टक्के) या शहरांना मागे टाकले.

सूद पुढे म्हणाल्या, दिल्ली व आसपासच्या क्षेत्रांमधील ग्राहक सुधारित सुविधा व सुधारित जीवनशैलीचा शोध घेण्यासोबत पारंपारिक मालमत्ता स्वरूपांमधून स्थलांतरित होत असल्यामुळे मागणीमध्ये वाढ झाली आहे. तसेच मर्यादित पुरवठ्याने देखील किमतीत वाढ होण्याप्रती योगदान दिले आहे.