विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीत 98.30 टक्के मतदान

वाशिम  – विधान परिषदेच्या अकोला-वाशिम- बुलढाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज 10 डिसेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 98.30 टक्के आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे गोपीकिसन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल निवडणूक रिंगणात आहे.

या निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यातील चार मतदान केंद्र,अकोला जिल्ह्यातील सात आणि बुलढाणा जिल्ह्यातील अकरा मतदान केंद्रावर मतदान झाले.जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मंगरूळपीर आणि रिसोड येथील मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.वाशीम येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेच्या 58 आणि वाशीम नगर परिषदेच्या 34 अशा एकूण 92 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कारंजा येथे नगर परिषदेच्या 32 सदस्यांनी, मंगरूळपीर नगरपरिषदेच्या येथील 21 सदस्यांनी आणि रिसोड नगरपरिषदेच्या येथील 23 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यातील एकूण 168 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले.जिल्ह्यातील चारही मतदान केंद्रावर एकूण 87 महिला मतदार आणि 81 पुरुष मतदारांनी मतदान केले.येत्या 14 डिसेंबर रोजी अकोला येथे मतमोजणी होणार आहे.या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.