अब्दुल सत्तारांच्या निवासस्थानी तोडफोड, राष्ट्रवादीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सत्तार यांच्या मंत्रालयाजवळील निवासस्थानापुढे आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात सत्तारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या गेल्या. यामुळे आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणी मंगळवारी (०८ नोव्हेंबर) विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या १८ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादमधील सिल्लोड येथे झालेल्या सभेत अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला. याबरोबरच त्यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत टिप्पणी दिली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तारांवर चांगलेच भडकले आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ सत्तारांच्या कफ परेड येथील पन्हाळगड या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यादरम्यान सत्तारांच्या निवासस्थानावर दगडफेकही करण्यात आली, ज्यामध्ये काही खिडकींच्या काचा फुटल्या.

त्यानंतर कफ परेड येथील पोलिस ठाण्यात याप्रकरणी राष्ट्रवादीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सत्तार यांच्या निवासस्थानासमोर बेकायदा आंदोलने केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण, अदिती नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक प्रमुख मेहबूब शेख आणि १५ पदाधिकाऱ्यांवर आयपीसीच्या १४३ सह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.