मनसे-शिवसेना एकत्र येणार? राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी संजय राऊतांच्या भेटीला

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी शिवसेना-भाजप युतीशी हात मिळवला आहे. या मोठ्या राजकीय नाट्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राज ठाकरे (Raj Thackeray) या बंधूंनी एकत्र यावे, अशी साद मनसे आणि शिवसैनिकांनी घातली आहे.

ही चर्चा सुरू असतानाच मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांच्याशी दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन 15 मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर संजय राऊत आणि अभिजित पानसे यांनी भांडूप ते प्रभादेवी पर्यंत कारमध्ये एकत्र प्रवास केला. संजय राऊत हे सामना कार्यालयातून थेट मातोश्रीवर गेले. तर दुसरीकडे अभिजीत पानसे ठाण्याला घरी न जाता शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. दोन्ही नेत्यांनी आधी भेट घेऊन नंतर आपल्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.