शिंदे-फडणवीस सरकारने शहरांची नावं बदलल्याने अबू आझमींना मिरच्या झोंबल्या, म्हणाले…

मुंबई – औरंगाबाद (Aurangabad)शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar)आणि उस्मानाबाद (Usmanabad)शहराचे नाव धाराशिव (Dharashiv) करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)होते. नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग (Revenue And Forest Department) तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल. याच मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

शहरांची नावं बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला. पण हे केवळ ढोंग असून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे, अशी टीका अबू आझमी (Abu Azmi)यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आझमी म्हणाले, देशात खूप मोकळी जमीन अस्तित्वात आहे. त्याठिकाणी नवीन शहरं बनवा आणि तुम्हाला हवं ते नाव द्या. पण त्यांना (शिंदे-फडणवीस सरकारला) एक संदेश द्यायचा आहे की याठिकाणी मुस्लीम नाव चालणार नाहीत.

औरंगजेबचा इतिहास मोडून-तोडून चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे. आज देशाला स्वातंत्र होऊन ७०-८० वर्षे उलटली आहेत. देशावर अनेक वर्षे इंग्रजांची सत्ता होती. पण हेच नाव कायम होतं. आता औरंगाबादचं नामकरण करून मतदारांचं धृवीकरण केलं जातंय. यामध्ये सर्वात जास्त नुकसान देशाचं होत आहे. देशातील २० टक्के अल्पसंख्यांकावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत आहे. त्यांना मशिदीत नमाज पठण करता येत नाहीये, मशिदीसमोर कीर्तन म्हटलं जातंय, मशिदीवरील भोंगे उतरवले जात आहेत, शहरांचं नामकरणं केलं जातंय, यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत आहे.असं ते म्हणाले.