मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे.

आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.