‘भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांवर हात उचलून लज्जास्पद भाजप संस्कृतीचे दर्शन घडवले’

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी बालगंधर्वमध्ये (Balgandharva) राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते (NCP and BJP workers) आमनेसामने आले असून भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. आता या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही अत्यंत वाईट घटना आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंत्री स्मृती इराणी आल्या असताना असा गोंधळ घालणे एकदम चुकीचे आहे. महिलांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना या महिला कार्यक्रमात कशा आल्या हा प्रश्न भाजपकडून विचारला जातोय.

दरम्यान, या घडामोडींवर आता राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्वीटर अकौंट वरून निषेध व्यक्त केला आहे. महिलांचा सन्मान (Respect for women) करणे ही भाजपची परंपरा नाही याचे ज्वलंत उदाहरण पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात पहायला मिळाले. भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांवर हात उचलून लज्जास्पद भाजप संस्कृतीचे दर्शन घडवले. असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.