राहुलजी गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून!: नाना पटोले

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून केला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मागील ९ वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार फक्त निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्ल्यासारख्या भ्रष्ट लोकांसाठी काम करत आहेत तर राहुलजी देश वाचविण्यासाठी लढत आहेत. देशातील जनतेचे करोडो रुपये घेऊन हे भ्रष्ट उद्योगपती देशाबाहेर पळाले. या भ्रष्टाचाराविरोधात राहुलजी गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला. अदानी-मोदींच्या संबंधावर लोकसभेत जाब विचारला. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर राहुलजी गांधी यांनी माफी मागवी म्हणून विरोधक मागणी करत होते पण राहुलजी गांधी यांना लोकसभेत बोलूही दिले नाही.

इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजपा सरकार आज वापरत आहे.राहुलजी गांधींचा चौकशीच्या नावाखाली आधी ईडीच्या (ED) कार्यालयात १०-१० तास छळ केला. शेवटी ते भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली. याचा आम्ही निषेध करतो, भाजपा सरकार व मोदी सरकारचा धिक्कार करतो आणि आगामी काळात आम्ही भाजपाविरोधात रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र संघर्ष करु.

यावेळी बोलताना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुलजी गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुलजी गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुददा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपाने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. केंब्रिज विद्यापीठातील (University of Cambridge) विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे याचा हा पुरावा आहे.

स्व. इंदिराजी गांधी (Indira Gandhi) यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता आता राहुलजी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. पण या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिराजी गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. राहुलजी गांधीसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.