सोने-चांदी वितळवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या चार भट्ट्यांवर मुंबईत कारवाई

Gold And Silver Furnaces: मुंबईतलं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेनं शहरातल्या सोन्या-चांदीचे दागिने बनविताना, हे धातू वितळवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या चार भट्ट्यांवर कारवाई केली आहे. दागिने बनवण्यासाठी धातू वितळवण्याचं काम लघु उद्योगांमधल्या छोट्या कारखान्यांमध्ये केलं जातं. ही प्रक्रिया करताना निघणारा धूर हवेत मिसळल्यानं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं त्यामुळे ही निर्णायक कारवाई करण्यात आली असल्याचं मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे.

जिथं भट्टीचा वापर होतो अशा व्यवसायांच्या ठिकाणी निर्माण होणारा धूर बाहेर टाकण्यासाठी चिमणीची व्यवस्था करणं बंधनकारक आहे. अशी व्यवस्था न केल्यास अपायकारक धूर हवेत मिसळून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. हे लक्षात घेऊन महापालिकेनं सोनं-चांदी वितळवताना योग्य खबरदारी न घेणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे.

दरम्यान, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवेच्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय पर्यावरण, वनं आणि हवामान बदल खात्याचे राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी काल आढावा बैठक घेतली. या बैठकीत चौबे यांनी हवेची गुणवत्ता व्यवस्थापन आयोग, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाच्या स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चौबे यांनी हवेतील प्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाला चिंता वाटणं स्वाभाविक असल्याचं सांगितलं.

प्रदुषणाच्या मुद्द्यात राजकारण येऊ न देता प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पीक कापणीनंतर शेतातील उर्वरित अवशेष जाळणं थांबवावं, अशी न्यायालयानं केलेली सूचना योग्यच असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान राजधानीतल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काल संध्याकाळी 400 च्या आसपास होता. ही हवेच्या गुणवत्तेची अतिशय खालावलेली पातळी मानली जाते.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’