केतन पेंडसे मराठीनंतर हिंदी इंडस्ट्री गाजवायला सज्ज..! अभिनयासोबत आता दिग्दर्शनही करणार

ते म्हणतात ना… आवड आणि आत्मविश्वास असेल तर माणूस काहीही करू शकतो. अगदी असच काहीसं आहे ‘त्याच्या’बाबत. ‘त्याने’ ना अभिनयाचे धडे गिरवले, ना ‘तो’ आजकालच्या नेपोटिस्ममध्ये मोडतो. ‘त्याला’ अभिनयाची आवड होती आणि ती ‘त्याने’ अशी काही जोपासली की आज ‘तो’ एक चांगला अभिनेताच नव्हे तर चांगला दिग्दर्शक बनण्याच्या वाटेवर आहे. स्वबळावर आज ‘तो’ मराठी इंडस्ट्रीबरोबर हिंदी इंडस्ट्रीतही आपलं नाण खणखण वाजवायला सज्ज आहे. तो अजून कोणी नसून “अभिनेता केतन पेंडसे” (Ketan Pendase) आहे.

वयाच्या २३ व्या वर्षी ‘एक थ्रिलर नाईट’ या मराठी सिनेमातून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पुढे हाती येईल ती संधी दोन्ही हातांनी घट्ट पकडत अपार कष्टानं त्याने आपल स्वप्न प्रत्यक्षात जगलं. आज वयाच्या तिशीत त्याने स्वत:ला यशाच्या शिखरावर पोहचवलंय. केतन पुढच्या वर्षी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण करतोय. याच केतन पेंडसेच्या मराठी ते हिंदी सिनेमातील प्रेरणादायी प्रवासाचा हा मागोवा…

सर्वप्रथम केतनच्या मराठी कारकिर्दीवर नजर टाकू. २०१५ साली केतनला अभिनय क्षेत्रात ब्रेक मिळाला. ‘एक थ्रिलर नाईट’, या हॉरर आणि सस्पेंसने भरलेल्या सिनेमात केतनने मुख्य भूमिका साकारली. एका भूतबंगल्यात मध्यरात्री अडकलेल्या मित्रमंडळींचा एक गट भयावह प्रसंगांना सामोरे जातो आणि त्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटात केतनने आपली आकाश देसाईची भूमिका अगदी योग्यरित्या पार पाडली. त्याच्या अभिनयाचं बक्षीस त्याला २०१६ सालच्या NIFF (नासिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) मध्ये मिळालं. ‘एक थ्रिलर नाईट’ या पदार्पणाच्या मराठी चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता ज्युरी पुरस्कार’ केतनला मिळाला. अशाप्रकारे सुरुवातीलाच केतनला त्याच्या भावी सिने प्रवासासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले.

पुढे ‘गुमनाम एक थ्रिलर नाईट’ (२०२०-२१) या मराठी सिनेमात तो मुख्य भूमिकेत झळकला. ‘बिंडi’ सिनेमातही त्याने सेकंड लीड भूमिका साकारली. शिवाय ‘पुन्हा २६/११’, ‘लव्ह बेटिंग’, ‘कारवा’, ‘कंफ्यूज’ अशा मराठी सिनेमात त्याने कॅमिओही केला. याबरोबरच त्याने बऱ्याचशा शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. त्यातही केतनची केतकी चितळेसोबतची ‘गुप्त’ ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना चांगलीच भावली. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या शॉर्ट फिल्मला ‘११व्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०२१’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट मराठी शॉर्ट फिल्म’चा पुरस्कार मिळाला. खुद्द अभिनयाचा दांडगा अनुभव असलेल्या मकरंद अनासपुरेंच्या हाती हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘गुप्त’ या शॉर्ट फिल्मने ‘गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’च्या आठव्या पर्वात ‘सर्वोत्कृष्ट हॉरर शॉर्ट फिल्म’चा पुरस्कार पटकावला. गुप्तबरोबरच केतनच्या ‘ब्लू शू’ या मराठी शॉर्ट फिल्मनेही बरेचसे पुरस्कार जिंकले. इतकेच नव्हे, ‘रूप तुझं भारी’, या अल्बम गीताद्वारेही केतनने चाहत्यांची मने जिंकली.

२०२२ मध्ये ‘खेळ संसारा’चा ही केतनची मराठीतील शॉर्ट फिल्म येतेय. ‘लव्ह लव्हर जिंदाबाद’ हा केतनचा मराठी सिनेमाही २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

जवळपास ५ वर्षे मराठीत काम केल्यानंतर केतनसाठी हिंदी इंडस्ट्रीची दारे खुली झाली. ‘कही किसी रोज’, ‘स्ट्रेंज’ यांसारख्या पुरस्कार विजेत्या हिंदी शॉर्ट फिल्म केतनने केल्या. या यादीत ‘गुप्त’, ‘गुमनाम’, ‘स्केअर्ड’, ‘स्माईल’, ‘गुमनाम है कोई’, ‘घोस्ट’, ‘द ट्रॅप’ यांसारख्या हिंदी शॉर्ट फिल्मचाही समावेश होतो.

तसेच येणारे २०२३ वर्ष केतनसाठी त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पाँईट ठरेल. कारण पुढील वर्षी त्याचा हिंदीतील पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘अदृश्यम’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही स्वत: केतननेच केले आहे. मधुलिका भट्टाचार्य, भाग्यश्री देसाई, राहुल साळुंखे, प्रतिभा भगत या कलाकारांनी या सिनेमात काम केले आहे. याखेरीज ‘थ्रिलर नाईट रिटर्न्स’ हा केतनचा हिंदी सिनेमाही २०२३ मध्येच प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे, केवळ हिंदी सिनेमेच नव्हे तर केतनच्या २ मोठ्या वेब सिरीजही याच वर्षी येतायत. ‘मडगाव द क्लोज्ड फाइल’, ही हिंदी वेबिरीज आणि ‘ती परत आलीय’ ही मराठी वेब सिरीज यांचा यात समावेश आहे. शिवाय ‘अगम्य’ आणि ‘लग्नचक्र’ या मराठी सिनेमात केतन मुख्य भूमिकेत असून हे सिनेमेही २०२३ लाच प्रदर्शित होणार आहेत.