कौतुकास्पद : सुट्टी असणाऱ्या अग्निशमन जवानाने विझवली घराला लागलेली आग; धोका टळला

पुणे – नुकतीच दुपारी कोंढव्यात गोडाउनला लागलेली भीषण आग व शहरात घडणारया आगीच्या घटना अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कर्तव्य बजावत पार पाडतात खरे पण सतर्कता व समयसूचकता या जवानांमध्ये कायम दिसून येते. अशीच सतर्कता व समयसूचकता वडाची वाडी येथे राहणारे फायरमन राहुल बांदल यांनी त्यांची सुट्टी असताना ही दाखवली.

घटना अशी की, आज रात्री आठच्या सुमारास पिसोळी, हॉटेल आंबेकर येथे असणाऱ्या एका घरामधे सिलेंडरने पेट घेतला अन घरात आग लागली. तेथेच शेजारी राहणारे रोहित सोनी यांनी लगेच त्यांचे मिञ जवान राहुल बांदल यांना फोन करुन कळविले. जवान बांदल हे सुट्टी म्हणून घरीच असल्याने ते अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचत त्यांनी आपल्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.

जवान बांदल यांनी घटनास्थळी कोणी अडकले का याची खाञी करुन लगेचच घरातील दोन सिलेंडरवर एका नळीच्या साह्याने पाणी मारत सिलेंडर बाहेर काढले व मोठा धोका दूर केला व स्थानिकांच्या मदतीने पाण्याचा वापर करून पुर्ण आग विझवली. यामधे काही प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान झाले. परंतू आग वेळीच विझवल्याने आग न पसरता मोठा अनर्थ टळला. जवान राहुल बांदल यांनी सुट्टीवर असताना देखील बजावलेल्या या कर्तव्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांचे कौतुक करत अग्निशमन दलाचे ही आभार मानले.