‘कोणत्याही देवाच्या मूर्ती, पूजा, आरत्या शाळा-कॉलेजमध्ये होणे हा सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही’

पुणे : हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या संदर्भातील याचिकाही कर्नाटक कोर्टाने फेटाळून लावली आहे.

या निर्णयावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘हिजाब बंदी योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. हिजाब घालणे हा धर्म स्वातंत्र्याचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण सगळ्यांनी स्विकारले पाहिजे. या निर्णयाने आपण संवैधानिक होण्याकडे एक पायरी चढलो आहे. आपला संविधानिक होण्याचा प्रवास सुरु राहील व समजदारी वाढवित जाऊन आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे की कोणत्याही देवाच्या मूर्ती, पूजा, आरत्या शाळा, कॉलेजमध्ये होणे हा सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही.’ असं सरोदे म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण उडुपी येथील एका महाविद्यालयापासून सुरू झाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सहा मुली हिजाब परिधान करून वर्गात आल्या आणि प्रत्युत्तर म्हणून हिंदू विद्यार्थी भगवे उर्पण घालून महाविद्यालयात आले. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागातही पसरला, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला.