सरनाईक पुन्हा अडचणीत : 37 हजार चौरस मीटर भूखंड लाटल्याचा आरोप

ठाणे –   टॉप्स ग्रुप आणि NSEL घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी यापूर्वीच अडचणीत असलेले  शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सरनाईक   यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाण्यात (Thane) दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.(Pratap Sarnaik in trouble again)

इमारती बांधण्यासाठी भूखंड हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या जनहित याचिकेवर येत्या तीन ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. एका प्रकरणातून काहीसा दिलासा मिळालेला असताना आता प्रताप सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता तीन ऑक्टोबरला सुनावणीदरम्यान काय होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय म्हटले आहे सरनाईक यांच्याविरोधातील याचिकेमध्ये?

ठाण्यात ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी जागा अपुरी आहे. त्यामुळे महापालिकेने दोन विकास आराखड्यांत शहरासाठी 10 भूखंड राखीव ठेवले होते. मात्र, एकही भूखंड हस्तांतरित केलेला नाही. भायंदर पाडा, जीबी रोड जवळ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे, तिथे दफनभूमीसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता.या भूखंडाची सद्य:स्थिती पाहण्यासाठी याचिकाकर्ते गेले असता, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या बहुमजली इमारतीसाठी संबंधित भूखंड अनारक्षित केल्याचे समजले. दरम्यान, ही माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने सरनाईक यांच्या कंपनीला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली आहे.