आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? फडणविसांनी पेनड्राईव्ह दिल्यानंतर गृहमंत्र्यांचा सवाल 

मुंबई   – केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक- तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर करतात आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. यामध्ये काही हॉटलाईन बसवली आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच विरोधी पक्षनेते न्यायालयात जाणार बोलत आहेत याचा आनंद वाटला ‘एका तरी यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे’ असा जबरदस्त टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावतानाच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

काल सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार बॅटींग करत विरोधकांचे अक्षरशः वाभाडे काढले. सरकारने गृहविभागासाठी घेतलेले चांगले निर्णय सांगतानाच भाजपने केंद्रीय यंत्रणांचा केलेला गैरवापर, अवैध फोन टॅपिंग, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेली गैरकारवाई यासह देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह सभागृहात दाखल केला त्यावर भाष्य करत सत्य बाहेर काढण्याचे व सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

विरोधी पक्षनेत्यांनी भाषण करत असताना १९९३, २००८ च्या बॉम्बस्फोटाचा विषय काढून त्यावर भाषण केले. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. मी देखील गृहमंत्री म्हणून काम केले आहे असे बोलताना देशात नियमाने काम करणारे असे महाराष्ट्राचे पोलिस दल आहे ही भावना मांडली परंतु असताना दुसऱ्या बाजूला याच पोलिस दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे द्या, असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे दुःखद असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

नवाब मलिक यांची ही केस सीबीआयला देऊन नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. १९९३ चा बॉम्बस्फोट होऊन आज बरीच वर्ष झाली आहेत. २००५ ते २००८ मध्ये मुंबईमध्ये हल्ले झाले. याचवेळी विरोधी पक्षनेत्यांनी स्टिंग ऑपरेशनचा विषय काढला. १२५ तासांचे फुटेज असलेले पेनड्राईव्ह अध्यक्षांकडे दिले. विरोधकांचा आरोप काही जरी असला तरी मी कोणाचीही पाठराखण करणार नाही. या सर्व घटनेच्या पाठीमागे नक्की कोण आहे? याचा तपास केला जाईल असेही दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले.

आपण मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना ३३ हजार विहीरांचा जलयुक्त शिवार कामाचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपुर्वी आपण आणखी एक पेनड्राईव्ह दिला आणि आजही एक पेन ड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना करताच सभागृहात एकच हशा पिकला.

आपण जो पेनड्राईव्ह दिलेला आहे, त्याचा तपास राज्यशासन करणार आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे, तो सरकारने स्वीकारला आहे हे सांगतानाच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर करत त्या चौकशीतून वस्तूस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवाब मलिक हे पाच वेळा आमदार झालेले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात ते आवाज उठवत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केली गेली असे सांगतानाच मागच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्याकाळातच तुम्ही नवाब मलिक यांच्यावरील कारवाई पुर्ण केली असती तर बरं झालं असतं असा टोलाही दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. विरोधी पक्षनेत्यांनी आज आणखी एक पेनड्राईव्ह दिला. त्यात डॉ. मुद्दसर लांबे यांची वक्फ बोर्डावर निवड केल्याचे सांगितले मात्र ही निवड भाजप सरकारच्या काळात झाली आहे. त्याचाही तपास केला जाईल असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२१ च्या अधिवेशनात काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी फोन टॅपिंग होण्याचा विषय मांडला होता. त्यावर चौकशी करायला त्यांनी सांगितले होते. २०१५ ते २०१९ या काळातील फोन टॅपिंगची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्यसरकारने अहवाल स्वीकारला. या फोन टॅपिंगमध्ये नाना पटोले यांचे नाव अमजद खान ठेवले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख नागपाडा, (मुंबई) ,संजय काकडे हे त्यावेळी भाजपचे खासदार होते, त्यांचे नाव तरबेज सुतार, (कात्रज) आशिष देशमुख देखील त्यावेळी भाजपचे आमदार होते, त्यांचे नाव रघू चोरगे, आशिष देशमुख यांच्या दुसऱ्या नंबरला हिना महेश साळुंखे असे नाव ठेवले होते. या सर्वांवर अंमली पदार्थांची अवैध विक्रीचा आरोप ठेवून फोन टॅप केले गेले याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.

सत्ता असो वा नसो. पण एक अधिकारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अशी पाळत ठेवतो हे सभागृहाच्या निदर्शनास आणतानाच आमच्या सदस्यांवर पाळत ठेवली असती तर समजू शकलो असतो, पण भाजप सदस्यांवरच पाळत ठेवली जात होती याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.

अनिल देशमुख यांच्याबाबतीत देखील असेच घडले आहे. घटना काय होती? तर अँटेलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या. त्या प्रकरणात मनसूख हिरेनचा खून झाला. केस एनआयएकडे गेली.अंबानींच्या घराच्याखाली जिलेटिनच्या कांड्या का ठेवल्या? याचे नेमके कारण एनआयएने अद्याप सांगितलेले नाही. या प्रकरणातील एक आरोपी पोलिस अधिकारी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर आरोप करतो आणि त्यातील सत्यता न पडताळता ईडीची रेड पडते. ईडीने आजवर देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर ९० छापे घातले आहेत. तपास कसा करावा हा भाग त्यांचा असला तरी एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणेचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे यातून दिसते असेही दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.

या २९३ प्रस्तावाचा विषय खूप मोठा आहे. यावेळी काही मार्गदर्शन मिळेल असे वाटले होते. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी केवळ दोन प्रकरणासाठी वेळ खर्ची केला. मी सर्व सदस्यांच्या विषयांना घेऊन उत्तर देईन असे प्रस्तावाला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी सुरुवात केली.