शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा मोठा गट लवकरच महायुतीत सामील होणार?

Congress : महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रतापराव जाधव यांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे काँग्रेसचा मोठा गट लवकरच महायुतीत सामील होईल, असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वरिष्ठ लोकांना डावलून विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या कनिष्ठ (ज्युनिअर) माणसाला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने काँग्रेसमधील सगळे वरिष्ठ नेते अतिशय अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घ्यायची गरज नाही. संबंधित नेत्यांची नावं आपल्या सर्वांना माहीत आहेत. ते सर्वजण अतिशय अस्वस्थ झाले आहेत. ते योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात महायुतीत सहभागी होईल असा दावा त्यांनी केला आहे.