ठाकरेंचा दबाव आणि पवारांच्या मध्यस्थीनंतर राहुल गांधी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय   

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं चांगलच वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेना (shivsena) ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.  यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील बेबनाव उघड झाला होता.

आता या वादात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निर्णायक हस्तक्षेप करत राहुल गांधींना जरा सबुरीने घेण्याचा सल्ला देत सावरकरांवर थेट टीका करणे टाळा, अशी सूचना केली. स्वतः राहुल गांधींनीही मी पवारांचा आदर करीत असल्याचे सांगत सहकारी पक्षातील मित्रांसाठी सावरकरांबाबत मवाळ भूमिका घेण्यास अनुकूलता दर्शविली आहे.

या बैठकीत शरद पवार यांनी सावरकरांवर होणारी टीका वगळता सगळ्याच मुद्द्यांवर सहमत असल्याचे सांगितले. आपली लढाई ही मोदीशी आहे. त्यात सावरकरांना ओढणे योग्य नाही. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध नव्हता. सावरकर विज्ञानवादी होते आणि त्यांची विधानेही लक्षात घ्यायला पाहिजे. सावरकरांवर टीका केल्यास त्याचा महाराष्ट्राच्या आघाडीला फायदा होणार नाही, असे स्पष्ट पवारांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. पवारांच्या या भूमिकेवर खर्गे यांनीही आपल्या मताचा आदर करत असल्याचे सांगितले राहुल यांनीही मी पवारांच्या मताचा आदर करतो, असे सांगत मित्रपक्षासाठी मी हा विषय वगळण्यास तयार असल्याचे नमूद केले.