मोदी सरकारला फक्त उच्चवर्णीय महिलांनाच पुढे करायचे आहे; ओवेसींचा महिला आरक्षण विधेयकाला विरोध

Nari Shakti Vandan Bill – आज सकाळी नवीन संसद भवनात विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली. महिला आरक्षणविषयक नारीशक्ती वंदन विधेयकावरील चर्चेला सदनात प्रारंभ झाला. मात्र महिला आरक्षणाच्या विधेयकाला AIMIM पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी विरोध दर्शवला आहे.

ते म्हणाले की, मुस्लिम महिलांची लोकसंख्या ७ टक्के आहे, पण या लोकसभेत त्यांचे प्रतिनिधित्व केवळ ०.७ टक्के आहे. या मोदी सरकारला केवळ उच्चवर्णीय महिलांनाच पुढे करायचे आहे. मुस्लिम महिला शिक्षणातही मागे आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा, असे ओवेसी म्हणाले.

शाळा सोडणाऱ्या मुस्लिम महिलांची टक्केवारी १९ टक्के आहे, तर इतरांची केवळ १२ टक्के आहे. ओवेसी म्हणाले की, या मोदी सरकारला सवर्ण महिलांचे प्रतिनिधित्व वाढवायचे आहे. निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत ६९० महिला संसदेत निवडून आल्या आहेत आणि त्यापैकी केवळ २५ मुस्लिम आहेत. मुस्लिम महिलांशी हा दुहेरी भेदभाव असल्याचं ओवेसी म्हणाले. पहिलं, मुस्लिम म्हणून आणि दुसरं स्त्री म्हणून तिच्याशी भेदभाव केला गेला.