‘तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का ?’; मराठा आरक्षणाबाबत विचारणा करणाऱ्या व्यक्तीवर अजितदादा संतापले

जुन्नर – मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना जाब विचारताच अजित पवार यांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले.

प्रेक्षकांमधील एका व्यक्तीकडून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली.  त्यानंतर अजित पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार चिडले. तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असा प्रतिप्रश्न करत त्या व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले.

मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर नेता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी प्रधानमंत्री महोदयांचीही भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले, त्यांचा तो वारसा सर्वांना सोबत घेवून पुढे जायचे आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.