देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, फक्त भाजपच राहील : नड्डा

पाटणा : देशभरात विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरु झाल्यानंतर भाजपवर विरोधक टीका करत आहेत. प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्लान सुरु असल्याची टीका विरोधक करत असताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले.

बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जे.पी. नड्डा यांनी अत्यंत आक्रमक शैलीत केलेल्या भाषणात देशभरातील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा इशारा दिला.आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत तेदेखील संपतील. केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.

लोक काँग्रेसविषयी बोलतात. माझं मतं आहे की, पुढील ४० वर्षे तरी काँग्रेस पक्ष भाजपसमोर उभा राहू शकत नाही. ते आपली बरोबरी करू शकत नाहीत. भाजप ज्याप्रकारचा पक्ष आहे, ते काही दोन दिवसांमध्ये साध्य होत नाही. हे सर्व संस्कारातून येते आणि संस्कार हा पक्षाकडूनच येतो. भाजपची विचारधारा इतकी पक्की आहे की, २० वर्षे दुसऱ्या पक्षांमध्ये राहिलेले लोक आपल्याकडे येत आहेत, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.