जे.पी. नड्डा याचं ‘ते’ वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Mumbai : देशभरात विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरु झाल्यानंतर भाजपवर विरोधक टीका करत आहेत. प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्लान सुरु असल्याची टीका विरोधक करत असताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले.

यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, जे. पी. नड्डा यांचं भाषण ऐकलं. त्यात ते म्हणत आहेत की लोकं २०-३० वर्षे इतर पक्षात काम करून भाजपात येतात. म्हणजे इथं यांचं कर्तुत्व शून्य आहे. आता यांच्याकडे काहीच आचार-विचार नाही. भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे.

महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं नड्डा म्हणतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा. राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

आजचं राजकारण अत्यंत निर्घृण आणि घृणास्पद आहे. त्यांच्यासोबत येतील ते आपले हे राजकारणातलं समजू शकतो. मात्र, जे आपले गुलाम होतील ते काहीकाळ आपले आणि त्यांचं काम संपलं की ते गुलाम जातील. यातून त्यांनी गुलामगिरीकडे जाण्याची दिशा ठरवली आहे. त्याचा सर्वांनी प्रत्येक पातळीवर विरोध करायला हवा, असंही ठाकरेंनी नमूद केलं.