कमालच झाली : SBI म्हणते गरोदर महिला अनफिट

मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने नवीन रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठी नुकतीच नवी नियमावली जाहीर केली. या नियमावली नुसार रुजू होणारी महिला उमेदवार ३ महिन्यांपेक्षा अधिक काळाची गरोदर असल्यास संबंधित महिला उमेदवाराला कामावर रुजू होता येणार नाही. गरोदर महिला तात्पुरती फिजिकली अनफिट आहे, असे समजण्यात येईल तसेच संबंधित महिला उमेदवाराला प्रसूतीच्या ४ महिन्यानंतर रुजू होता येईल, असे या नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कामगार संघटनांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. SBI च्या या नवीन नियमावलीमुळे संबंधित महिला उमेदवाराच्या कार्यकालीन कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ शकतो. SBI ला समुपदेशनाची गरज आहे. या नवीन नियमावलीमुळे महिला उमेदवारांमध्ये भेदभाव केला जात आहे, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची हि नवी नियमावली मागास विचारांना बढावा देत आहे असे बँकिंग तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. या नवीन नियमावलीचा फेर विचार व्हावा असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, या वादग्रस्त नियमावली विरुद्ध निर्मला सीतारामन काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.