महाराष्ट्रातील जनता भाजपला त्यांची लायकी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही – अमोल मिटकरी

मुंबई : आपलं खोटं कसं रेटून सांगायचं ही भारतीय जनता पक्षाची जुनी खोडसट परंपरा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांनी एकदा आत्मचिंतन करावे, अशी सूचना अमोल मिटकरी यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुन्हा एकदा वाद उकरून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर आता थांबवावा. महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पक्षाला कधीच समर्थन देणार नाही, असेही ते म्हणाले.

हळूहळू अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे मुद्दे पुढे येतीलच. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांनी भरकटवली. इतकेच नव्हे तर राज्यपाल कसे चुकीचे आहेत, हे खुद्द भाजपनेही सांगितलं आहे. मविआ सरकार बुलंद आहे व पुढील २५ वर्ष देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. जनतेच्या मनात भाजपबद्दल रोष आहे.

ओबीसी, धनगर व मराठा आरक्षण तुम्ही देऊ शकला नाहीत, ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तुम्ही देऊ शकला नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू शकला नाहीत. या सरकारने किमान भीमा कोरेगावचा विकास आराखडा तयार केला. महाराष्ट्राच्या मा. अर्थमंत्र्यांनी आमदारांनासुद्धा विकास निधी दिला. त्यामुळे भाजपचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातील जनता भाजपला त्यांची लायकी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.