“अनिल देशमुख हिंदू, मराठा असल्याने लगेच राजीनामा पण नवाब मलिक …”; नितेश राणेंचं थेट खटक्यावर बोट

मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीकडून पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना देखील मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, यातच  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं, असं म्हणत मलिक यांचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. पवार यांच्या याच वक्तव्यावरुन आता भाजपा नेते नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राणे ?

“अहो, अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले म्हणून ते आतमध्ये आहेत, देशद्रोही म्हणून आतमध्ये नाहीयेत. देशाविरोधात कारवाई करतायत म्हणून आतमध्ये नाहीयत. त्यांचा राजीनामा तुम्ही लगेच घेता तर नवाब मलिकांचा का घेत नाही? मग आम्ही असं म्हणायचं का अनिल देशमुख एक हिंदू आहेत, मराठा आहेत म्हणून त्याचा राजीनामा लगेच घेतला. नवाब मलिक एक मुस्लीम कार्यकर्ता आहेत म्हणून त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही असं विचारलं तर चालेल का?,” असा प्रश्नही नितेश राणेंनी पवारांना सवाल केला आहे.

दरम्यान, गेले 13 दिवस सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मलिक यांच्या ईडी कोठडीची मुदत काल संपल्यामुळे त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं, यावेळी न्यायालयानं त्यांना येत्या 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही.