पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे केसरकर साहेब जाणुन आहेत – मिटकरी

मुंबई – आजपर्यंत राज्यात शिवसेना (Shiv Sena) जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या, याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले.

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले  शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर वेले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

दरम्यान, केसरकर यांनी केलेल्या या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही. असं मिटकरी यांनी म्हटले आहे.