‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यंतरानंतर कंटाळवाणा, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

मुंबई : ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यंतरानंतर कंटाळवाणा आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त चित्रपटाच्या निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मिरी पंडितांना घरे बांधण्यासाठी रक्कम दान करायला सांगा, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.

काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते, असे जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो ‘डंके की चोट पे’ असे वक्तव्य केले. ज्यांना आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे असे त्यांनी ओरडतच सांगितले. यावर ना. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावले.

‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर जागेवर बसूनच, जोरजोरात बोलून गोंधळ करत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा, आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका, असे स्पष्ट शब्दात जयंत पाटील यांनी सुनावले.