राज ठाकरेंचा पैसा गुंतलाय म्हणून… ‘हर हर महादेव’ सिनेमावरून अमोल मिटकरींचा मनसेवर निशाणा

Har Har Mahadev Controversy: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा सध्या वादात सापडला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली गेली असल्याचे आरोप राजकीय क्षेत्रातून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून ठाण्यातील विवियाना मॉलमधील हर हर महादेवच्या चालू शोमध्ये राडा घातला. मात्र मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पुन्हा हा शो सुरू केला.

यामुळे हर हर महादेव सिनेमावरून राष्ट्रवादी आणि मनसे (NCP vs MNS) आमनेसामने आले आहेत. अशातच वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा चिमटा काढला आहे. मनसेवर टीका करताना त्यांनी चक्क राज ठाकरे यांच्यावर हर हर महादेव चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.

काय म्हणाले अमोल मिटकरी?
आमदार अमोल मिटकरी यांनी आज ट्वीट करत लिहिले की, सन्मा. राज साहेब ठाकरे यांनी “हर हर महादेव” या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले अशी चर्चा आहे कदाचित म्हणुन काहिकांचा इतका आकांड तांडव सुरु नसेल ना? राज साहेबांनी खुलासा करावा. आपण शिवप्रेमी आहात म्हणुन विचारतोय.’

अमोल मिटकरींच्या या वक्तव्यावर अद्याप राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया पुढे आलेली नाही. दरम्यान, आगामी काळात राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो असं चित्र आहे.