२०१४ नंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला; देशाला, धर्माला मसिहा वाटणारे मोदी आज तसे वाटत नाहीत : आनंद दवे

पुणे : ‘हिंदू- मुस्लीम दंगे घडवून सत्तेवर राहण्याचे नियोजन घातक आहे. काश्मीर, मणीपूर जळत असताना लक्ष न देणारा पंतप्रधान आपल्यासमोर आहे.मेवात, कैराना घडत असताना काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स सारखे चित्रपट पुन्हा काढायचे का , असा प्रश्न आहे.देशाला यादवी युद्धाचा धोका आहे, हिंदूंनी जागे झाले पाहिजे ‘, असा इशारा हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी रविवारी दिला.

देशाची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,वाढलेले कर्ज,बेरोजगारी, प्रत्येक पावलावर देशाचा होणारा अपमान,अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रातील राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी हिंदू महासंघाने छोटी सभा आयोजित केली होती. या सभेत आनंद दवे यांनी सत्ताधारी भाजपाच्या निराशाजनक कामगिरीवर , धोरणांवर कडाडून टीका केली.

रविवार, दि.१३ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कुल(टिळक रस्ता,पुणे)च्या गणेश सभागृहात सायंकाळी ६ वाजता ही सभा झाली.हिंदू महासंघाची ही पहिलीच जाहीर सभा होती.हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन केले आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

विद्या घटवाई यांनी सूत्रसंचालन केले. भगवान कोकरे, मनोज तारे, विवेक परदेशी , राहुल आवटी, मनोज जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

भगवानमहाराज कोकरे म्हणाले, ‘ध्येयाने एकत्र आलेले प्रत्येक वेळी हरले नाहीत, आणि खूप संख्येने एकत्र आलेले प्रत्येक वेळी जिंकले नाहीत. गोहत्याबंदी आहे तर हिंदुत्ववादी पक्षाच्या राज्यात सर्व देशात गोहत्याबंदी कायदा का होत नाही ? गोमांस निर्यात का केले जाते ? असा प्रश्नही कोकरे यांनी विचारला. आपले नाव देश पेटविणाऱ्यांच्या यादीत नसावे, तर राष्ट्र उभारणीच्या कामात असावे, असेही त्यांनी सांगीतले.

आनंद दवे म्हणाले, ‘मतदान कोणालाही केले तरी सरकार एकाच पक्षाचे येते अशी परिस्थिति आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नाही. हिंदूंवर अन्याय होत आहे.

२०१४ नंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला. देशाला, धर्माला मसिहा वाटणारे मोदी आज तसे वाटत नाहीत. महागाई,भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सक्षम झाला नाही. संसदेत हसणं खिदळणं चाललं आहे. नवी लक्झरी विमाने स्वतःसाठी घेतली गेली. दरवर्षी दोन कोटी प्रमाणे २० कोटी नोकऱ्या मिळाल्या का ?
रिझर्व बँकेच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. हिंदूंना गरीब आणि बेरोजगार कोण करत आहे ?असा प्रश्न दवे यांनी विचारला. किती दिवस नेहरूंची बदनामी करत जगायचे, स्वतःचे कर्तत्व दाखवले पाहिजे.

हिंदू- मुस्लीम दंगे घडवून सत्तेवर राहण्याचे नियोजन घातक आहे.जी -२० परिषदेच्या निमित्ताने गरीबी झाकण्याचे काम केले जात आहे. अदानीसारख्या उद्योजकाच्या रूपाने देशाचा पैसा बाहेर जात आहे. ६७ योजना जाहीर झाल्या पण अयशस्वी झाल्या.एलआयसी विकली जात आहे . मग तुम्ही सत्तेत असून करताय तरी काय ?

काश्मीर, मणीपूर जळत असताना लक्ष न देणारा पंतप्रधान आपल्यासमोर आहे.

पूलवामाचे आरोप का सापडले नाही. मग हे सत्तेवर कसे राहू शकतात. मेवात, कैराना घडत असताना काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स सारखे चित्रपट पुन्हा काढायचे का , असा प्रश्न आहे.

मुलायमसिंग यांना पद्म पुरस्कार मिळाला पण, सावरकरांना भारतरत्न या सरकारला देता आले नाही, अशी टीकाही दवे यांनी केली.

देशाची मान खाली जात आहे…
‘मै देश झुकने नही दूंगा,बिकने नही दूंगा’ असे सद्याच्या राज्यकर्त्यांनी सांगितले होते.पण, देश प्रत्येक पावलावर देशाला मान खाली घालायला लागली आहे.देश बदलायला म्हणून आले होते आणि स्वतःच बदलले.आता राज्यकर्ते बुलेट ट्रेन, १५ लाख, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पादन,नवीन कॉलेजेस,स्मार्ट सिटी, घसरता रुपया,पेट्रोलचे भाव,२ कोटी नोकऱ्यां यावर बोलत नाहीत.काश्मीर,चीन,पंजाब,अमेरिका,कैराणा,मेवात,हिमाचल,दिल्ली प्रत्येक पावलावर या राज्यकर्त्यांनी देशाचा अपमान केला आहे. हिंदूची मान खाली जात आहे,देशाची शान जात आहे.अशा परिस्थितीत केंद्र सरकारला सर्वांनी जाब विचारला पाहिजे, असे प्रतिपादन आनंद दवे यांनी केले.

नुकतीच काश्मीर पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावरून हिंदू महासंघाने भाजपला आणि मोदी सरकारला पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत धारेवर धरले होते.या पत्रकार परिषदेला युथ ऑफ पनून काश्मीर’ संघटनेचे अध्यक्ष राजेश कौल खासकरून उपस्थित होते.याच परिषदेत १३ ऑगस्ट ला होणाऱ्या मेळाव्याची आणि जाहीर सभेची घोषणा करण्यात आली होती.त्यामुळे पुण्यात सभेबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

हिंदू महासंघाच्या वतीने संस्थापक आनंद दवे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारीने निवडणूक लढवली होती.भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभवही झाला होता. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केलेली असताना हिंदुत्वाच्या आणि देशहिताच्या मुद्द्यावर , आर्थिक आरक्षणाच्या मुद्यावर झालेली हिंदू महासंघाची सभा महत्वपूर्ण ठरली.