रणबीर कपूरने पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याची दर्शवली इच्छा, नेटकऱ्यांनी झापलं

भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असूनही त्यांचे आपापसांतील संबंध चांगले नाहीत. याचे पडसाद अगदी राजकीय क्षेत्रापासून ते क्रिकेट व मनोरंजन क्षेत्रापर्यंतही दिसून येतात. भारतात असे फार कमी अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत, ज्यांनी पाकिस्तानच्या चित्रपटामध्ये काम केले आहे. अशातच प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याने पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीत (Pakistan Film Industry) काम करण्याची इच्छा दाखवली आहे.

सौदी अरबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘रेड सी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये रणबीरने (Ranbir Kapoor) कमाल केली. या फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला ‘व्हेरायटी इंटरनॅशनल व्हॅनगार्ड अॅक्टर अवॉर्ड’ देण्यात आला. यादरम्यान पाकिस्तानच्या ब्लॉकब्लास्टर ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ या सिनेमाची त्याला भुरळ पडली आणि त्याने या सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर रणबीरने यावेळी पाकिस्तानी क्रूसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या फिल्म फेस्टिवलदरम्यान दर्शकांमधील एका सदस्याने रणबीरला विचारले होते की, “आज आमच्याकडे सौदी अरेबियासारखे व्यासपीठ आहे, जिथे एकत्र चित्रपट केले जाऊ शकतात. माझ्या चित्रपटासाठी तुला साइन करून मला आनंद होईल. तुला व तुझ्या टीमला सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानी टीमसोबत काम करायला आवडेल का?”

त्याच वेळी, या प्रश्नावर रणबीर कपूर म्हणाला, “अगदी सर. मला वाटतं कलाकारांना विशेषत: कलेमध्ये सीमा नसतात. द लिजेंड ऑफ मौला जटसाठी पाकिस्तानी चित्रपटसृष्टीचे खूप खूप अभिनंदन. आपण पाहिल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा हिट सिनेमा आहे. अर्थात मला एकत्र काम करायला आनंद होईल.”

मात्र, रणबीरच्या या वक्तव्यानंतर लोक चांगलेच संतापले असून सोशल मीडिया यूजर्स एकामागून एक प्रतिक्रिया देत आहेत.