महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचे ताई तोडताय ना हात ?

Pune :  शहरातील अन्नधान्य वितरणच्या विभागीय कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि कर्मचारी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करत महिला अधिकार्‍याचा विनयंभग केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप (रा. महात्मा गांधी सोसायटी , सहकारनगर) यांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Former corporator Subhash Jagtap)  याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा कार्यालयातील महिलेने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 2 जून रोजी सोमवार पेठ येथील जुनी जिल्हा परिषद येथील तिसर्‍या मजल्यावरील कार्यालयात घडला. सुभाष जगताप हे परिमंडळ विभागाचे दक्षता समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या भागातील नागरिकांचे रेशनकार्ड संबंधातील कागदपत्रे आणलेली होती. यावेळी, फिर्यादी या त्यांच्या सहकारी कर्मचार्‍याशी बोलत असताना जगताप यांनी फिर्यादी यांना मोठमोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांना स्पर्श करून मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून नोकरी घालविण्याची धमकी (Threat) दिली. याखेरीज पाहून घेण्याची धमकी देत त्यांना कार्यालयातील अन्य सहकारी व उपस्थित नागरिकांसमोर अपमानित करून त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप हे अन्न पुरवठा विभागातील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत अंगावर धाऊन गेल्याची घटना घडली आहे. महिलांवर हात उचलणाऱ्यांचे हात तोडून हातात देईन ही सुप्रिया सुळेंची भीष्मप्रतिज्ञा खरी करण्याची त्यांना सुवर्णसंधी आहे. ताई,तोडताय ना हात ? असं म्हणत वाघ यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर शरसंधान केले आहे.