पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे – पुणे (Pune) शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा  २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि या वर्षापासून काम सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) आयोजित येरवडा गोल्फ क्लब चौकातील धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपुलाच्या कोनाशिलेचे अनावरण करुन लोकार्पण तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर, येरवडा येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे खडकी कटक मंडळ हद्दीतील जुना पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करुन  बी.आर.टी मार्ग, बावधन बुद्रुक या गावामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या पाईप लाईन, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार संजय पाटील (MP Sanjay Patil), आमदार सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble), माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर,  सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार,  मुख्य अभियंता प्रकल्प श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

प्रगतीशील पुणे तयार करण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचे ६० टक्के आणि ४० टक्के महानगरपालिकेने खर्च करण्याच्या योजनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शहरात नाल्यालगतच्या भागातील पूर परिस्थितीचा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.शहराबाहेरील रिंगरोडचे कामही वेगाने हाती घेण्यात येत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला १०  हजार कोटी रुपये लागणार असूनही या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या माध्यमातून पुण्याच्या आर्थिक विकासाला मदत मिळेल. हा रिंगरोड अडीच लाख कोटी रुपयांची व्हॅल्यु तयार करेल. पुढील १०  वर्षाची विकासाला दिशा देण्याचे कार्य हा मार्ग करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.