जो पर्यंत छगन भुजबळ यांच्या सारखे नेते आहेत तो पर्यंत काँग्रेसी विचार संपणार नाही – अशोक गहलोत

संगमनेर :- देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. त्यातून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र या अधिकारावर गदा आणण्याचे काम सध्या सुरु असून विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संगमनेर येथे स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त प्रेरणादिन व पुरस्कार सोहळा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग,उल्हासदादा पवार, डॉ.आ.ह.साळुखे, दिलीपराव देशमुख, डॉ.सुधीर भोंगळे, आमदार सर्वश्री लहू कानडे, हिरामण खोसकर,डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात अनेक पक्ष कार्यरत आहे. त्यांचे अध्यक्ष कोण आहे कोण होणार याबाबत कधी जास्त चर्चा होत नाही. मात्र कॉंग्रेसच अध्यक्ष कोण होतंय यावर अधिक चर्चा का होते यामध्ये विरोधकांना असलेली कॉंग्रेसची भिती आहे. कारण कॉंग्रेसचा हा नेहरू गांधी परिवाराचा इतिहास आहे. गांधी कुटुंबातील सदस्याने या देशासाठी बलिदान दिले असून देशाच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण असे योगदान आहे. तरी देखील कॉंग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र कॉंग्रेस हा घराणेशाहीचा नाही तर बलिदानाचा इतिहास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, देशात अनेक महत्वपूर्ण संस्थांची निर्मिती नेहरूंनी केली. त्यातील अनेक संस्था आज विकल्या जात आहे असे सांगत निर्माण करण्यात हुशारी लागते मात्र विकण्यास काय लागत ? असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

ते म्हणाले की, डॉ.अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात ही मंडळी म्हणजे ज्वलंत निखारेच होते. लोकांसाठी झटुन काम करण्याची वृत्ती आणि आपल्या दुरदृष्टीने महाराष्ट्रात शेती आणि सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल या मंडळींनी घडवुन आणले. देशाला लाभलेल्या कृषीमंत्र्यांपैकी अण्णासाहेब हे अतिशय वेगळे  व्यक्तिमत्त्व होते. रात्रंदिवस केवळ शेती आणि शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्या अण्णासाहेबांनी भारतीय शेतीसंशोधनाचा पाया घातला. वैज्ञानिक, प्रसारक आणि शेतकरी यांच्यात अजोड संगम घडवून आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. शेती हे त्यांच्या आयुष्याचे मिशन होते. त्यांच्याविषयी असा आदर स्वामीनाथन यांनी व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्य चळवळीतील नगर जिल्ह्यातील धगधगता निखारा होते. तरुण वयात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भाऊसाहेब एखाद्या ज्वलंत निखा-यासारखे पेटत राहिले, घडत राहिले. हे सगळे कशासाठी? तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. स्वातंत्र्यवीरांच्या यादीत अहमदनगर जिल्ह्यात ज्यांचे नाव ठळकपणे घेता येईल, असे भाऊसाहेब थोरात. हे नाव फार मोठे आहे. भाऊसाहेब थोरात हे नाव विलक्षण तेजाने तळपणारे  होते असे गौरोद्गार त्यांनी काढले. तसेच त्यांचा सामजिक कामाचा वारसा वासरा बाळासाहेब थोरात अतिशय निष्ठेने आणि चारित्र्यसंपन्न जीवन जगत सांभाळला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आ.ह साळुंखे बहुजनांच्या उन्नत्तिसाठी स्थापन झालेल्या शिवधर्माच्या प्रकट्नात आपले योगदान दिले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या परिवर्तन चळवळीचे आधारस्तंभ आहे. एक ज्ञान तपास्वी, एक तत्त्वज्ञ, एक विचारवंत, एक लेखक या पलीकडे एक अत्यंत विस्फोटक मनुष्य म्हणून डॉ. आ.ह साळुंखे यांची ओळख असून अतिशय मृद भाषेत स्फोटक आणि विश्लेषणात्मक लिहले आहे. बहुजन समाजाला आपल्या लेखनातुन ज्यांनी जागृक केला असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकार क्षेत्रातील एक शिस्तप्रिय नेता म्हणून दिलीपराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. या महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही कुटुंबीयांनी मोठे योगदान दिले त्यामध्ये थोरात कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांची नावे आदराने घेतली जातात असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच डॉ. सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, सहकार विषयक अडचणींची माहिती समोर आली. त्यांनी लिहिलेली शेती इस्राईलची, राजकारण पाण्याचे, कृषी चिंतन, पाणीदार, विकास वाटा, वादळ मळा, आपुलाची वाद आपणांसी ही अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. या तीनही मान्यवरांना ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जात आहेत ते महाराष्ट्रातील अतिशय लढाऊ, सहकार महर्षी, हरीत क्रांती ज्यांनी खऱ्या अर्थाने घडवून आणली अशीच मंडळी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले….

यावेळी आपल्या भाषणात बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक  गहलोत म्हणाले की मूळचा काँग्रेसी विचार कधीच संपणार नाही. जोपर्यंत छगन भुजबळ यांच्यासारखी मंडळी आहेत तोपर्यंत काँग्रेसी विचार संपणार नाही असे उदगार त्यांनी यावेळी काढले….