राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांप्रमाणेच माझी वाटचाल – धीरज घाटे

उद्यम सहकारी बँकेची 34 वी सर्वसाधारण सभा संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून संघ शाखेवर माझ्यावर झालेले संस्कार आणि मराठवाड्यात 5 वर्षे प्रचारक म्हणून काम करताना जे शिकायला मिळाले त्यानुसारच माझी वाटचाल सुरु असल्याचे भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) म्हणाले. उद्यम विकास सहकारी बँक लि.च्या 34 व्या सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक व माजी अध्यक्ष संदीप खर्डेकर, दिलीप उंबरकर, तज्ज्ञ संचालक सी.ए दिनेश गांधी, सी.ए.महेंद्र काळे, संचालक मनोज नायर,सीताराम खाडे, गोकुळ शेलार,राजन परदेशी, पांडुरंग कुलकर्णी, नगरसेविका व बँकेच्या माजी उपाध्यक्ष मंजुश्री खर्डेकर,कार्यकारी मंडळाचे मुरलीधर जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे व खातेदार, कर्जदार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बँकेच्या वतीने धीरजजी घाटे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बँकेचे खातेदार व कर्मचाऱ्यांच्या दहावी बारावी उत्तीर्ण गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात उल्लेखनीय असे दहावीत 99% गुण मिळविणारे जुळे बंधू निखिल परब, नील परब,तसेच बारावीत 97% गुण मिळविणाऱ्या जुळ्या बहिणी सलोनी वाळवेकर, सान्वी वाळवेकर यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना धीरज घाटे यांनी विद्यार्थ्यांच्या हातून भावी काळात समाजसेवा घडावी आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच बँकेच्या संचालक मंडळातील बहुतांश संचालक दीर्घकाळ समाजकार्यात असल्याने ते सचोटीने व्यवहार करतात व बँकेच्या प्रगतीसाठी झटतात असेही नमूद केले.

बँकेचे विशेष कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे यांनी अहवाल वाचन केले तर संचालक मंडळाच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी बँकेच्या भावी योजनांची माहिती दिली व उज्वल वाटचालीसाठी सर्व सभासदांनी साथ द्यावी असे आवाहन केले. तज्ज्ञ संचालक दिनेश गांधी यांनी सभासदांच्या प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे दिली.